ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. २५ : आर्वी ते बेनोडा रस्ता पावसामुळे अत्यंत खराब झाला. याबाबत ग्रामस्थांनी12 जुलै रोजी निवेदन दिले होते. यावर जि.प. बांधकाम विभागाने मुरूम, माती टाकून खड्डे बुजविले. शिवाय ते अर्धवट सोडण्यात आले. परिणामी, पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. यामुळे संतप्त नागरिकांनी भाजयुमोच्या नेतृत्वात उपविभागीय अभियंता जि.प. बांधकाम विभाग यांना त्यांच्यात दालनात कोंडून ठेवले. भाजयुमो जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांनी रस्त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत सुटका करणार नाही, अशी भूमिका घेतली.
परिणामी, उपविभागीय अभियंत्यांनी त्वरित शाखा अभियंता बिबे यांना आत्ताच काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या; पण कंत्राटदारांच्या मित्राचे अकस्मात निधन झाल्याने काम उद्यापासून सुरु करण्यात येईल, असे सांगितले. शिवाय तत्सम लेखी पत्र दिले. रस्त्याचा प्रश्न निकाली निघाल्याने आंदोलकांनी तूर्तास आंदोलन मागे घेत उपविभागीय अभियंत्यांची सुटका केली.