“माझ्या जिवाला धोका, उद्या हे माझ्या कुटुंबाचा घात करू शकतात”; जयश्री पाटील यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:09 PM2021-04-24T20:09:59+5:302021-04-24T20:11:24+5:30
अनिल देशमुखांवर सीबीआयने गुन्हा दाखल करून छापेमारी केली त्यावर अनेकजण शंका उपस्थित करत आहेत.
मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाला हा सत्याचा विजय आहे. कोणीही कोर्टाच्या कारवाईत हस्तक्षेप करू नये. कायद्याबाबत दिशाभूल कराल तर ते सहआरोपी होऊ शकतात. मला धमक्या येत आहेत. माझ्याही जिवाला धोका असून हे माझ्या कुटुंबाचाही घात करू शकतात असा गंभीर आरोप अँड जयश्री पाटील यांनी केला आहे.
जयश्री पाटील म्हणाल्या की, अनिल देशमुखांवर सीबीआयने गुन्हा दाखल करून छापेमारी केली त्यावर अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. मात्र याबाबत लवकरच सत्य बाहेर येणार आहे. त्यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल. येथे पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही एवढचं मला हसन मुश्रीफांना सांगायचं आहे. पाटलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का? असा टोला जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांना लगावला आहे. टीव्ही ९ ने त्यांची मुलाखत घेतली आहे.
तसेच हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार सीबीआयला कारवाईचे आदेश आहेत. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोर्टाचे आदेश वाचावेत. त्यानंतर विधानं करावीत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा प्रसार करून दिशा भरकटवण्याचं काम करू नये असंही जयश्री पाटील म्हणाल्या.
अनिल देशमुखांची तब्बल १० तास चौकशी
शनिवारी सकाळी ७.३० ते ७.४५ च्या सुमारास इनोव्हा आणि आर्टिका अशा दोन गाड्यांमधून सीबीआयचे पथक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवास्थानी दाखल झाले. पीपीई किट घालून असलेल्या या पथकात २ महिलांसह १० अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी देशमुखांना आपली ओळख सांगून चौकशीसाठी आल्याची माहिती दिली. यावेळी देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांसह सहा ते आठ जण नाश्ता करण्याच्या तयारीत होते. त्या सर्वांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले. प्रारंभी या पथकाने देशमुख यांच्या निवासस्थानाचा कानाकोपरा तपासला. कपाट लोकर आदींची तपासणी केल्यानंतर काही कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याची पाहणी केल्यानंतर या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांची प्रदीर्घ विचारपूस वजा चौकशी केली.