Anil Deshmukh, 100 crore extortion case: १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्यांची दिवाळी तुरुंगातच गेली. पण त्याचवेळी विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्या निर्णयाला आव्हान देत, त्यांनी मुंबईउच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
विशेष सीबीआय न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निकाल गुरुवारी राखून ठेवला होता. अनिल देशमुख व सीबीआयचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय देऊ, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे देशमुख यांची दिवाळी घरी की कारागृहातच साजरी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण शुक्रवारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांची दिवाळी तुरूंगातच गेली. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी त्यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका करण्यात आली आहे. त्यावर ११ तारखेला सुनावणी घेण्यात येईल.
राज्याचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केला व आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत सीबीआय व ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी जामीन मंजूर केला आणि सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र गुरुवारी सीबीआयतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी युक्तिवाद पूर्ण केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विशेष न्यायालयाचे न्या. एस. एच. ग्वालानी यांनी शुक्रवारी निकाल देऊ असे सांगितले. देशमुख यांना गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली होती.