Anil Deshmukh on Sunil Tatkare : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मोठा दावा केला होता. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) काही आमदार विलीनीकरणासाठी काँग्रेसकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं. सुनील तटकरेंच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचे ५ ते ६ आमदार काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या गटाची काँग्रेसमध्ये विलीन होण्याची इच्छा आहे. या सगळ्यानंतर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुनिल तटकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. शरद गटाचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवार गटाच्या नेत्याच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या विधानानंतर शरद पवार गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे?
"राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांतील एक मोठा गट काँगेसमध्ये जायच्या तयारीत आहे. मागील काही दिवसांपासून या आमदारांकडून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पक्षांतर्गत नाराजीतून हे आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत," असा दावा तटकरे यांनी केला होता.
सुनील तटकरे यांच्या दाव्यानंतर माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुख यांनी सुनील तटकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "तटकरे साहेब ४ जून फार दूर नाही, थोडं थांबा. आमचा पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या स्वाभिमानी व प्रगतिशील विचारांच्या पायावर उभा आहे. ४ जूनच्या निकालानंतर कुठे प्रवेशाची रांग लागते हे तुम्हाला समजेलच," असे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलताना येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले होते. तेव्हापासून याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. "पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील. किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल. मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत," असे शरद पवार यांनी म्हटलं होतं.