मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यास मंजूरी दिली आहे. (Anil Deshmukh Resigned: Home Minister Anil Deshmukh's resignation approved by the Governor)
याचबरोबर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठविले होते. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असे म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. याप्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टाने अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआयला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.
अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचे पत्र, जसेच्या तसे....
प्रतिमुख्यमंत्री उद्धव ठाकरेआदरणीय महोदयमा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंतीआपलाअनिल देशमुख