लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी विरोध केला. जे. जे. रुग्णालयातही देशमुख यांना खासगी रुग्णालयाप्रमाणेच उपचार मिळतील, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
देशमुख यांच्यावर उपचार केलेल्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता, परंतु आपत्कालीन परिस्थितीत तसे करण्याची गरज नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले. आपल्या निवडीच्या डॉक्टरांकडून उपचार घेणे, हा मंत्र्यांचा अधिकार आहे, असा युक्तिवाद देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी केला. त्यावर न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय मंगळवारपर्यंत राखून ठेवला.
देशमुख यांना खांद्याच्या दुखण्यामुळे दाखल केलेल्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडे चौकशी केली होती. त्यांचा खांदा निखळण्याचा दीर्घ इतिहास आहे आणि भविष्यात शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे ईडीने म्हटले आहे.
‘’त्यांच्या (देशमुख यांच्या) वेदना कमी होत नसल्याने त्यांना जे. जे. हॉस्पिटलने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. देशमुख यांची ही शस्त्रक्रिया रुग्णालयात व त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे करण्याची इच्छा आहे. ते ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या हृदयाच्या स्थितीवरही लक्ष ठेवावे लागेल’’, असा युक्तिवाद निकम यांनी केला.
न्यायालयातील युक्तिवाददेशमुख यांना खासगी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. ते जे. जे. रुग्णालयातच उपचार घेऊ शकतात, असे ईडीने म्हटले. जर देशमुख खासगी रुग्णालयाचा खर्च करण्यास तयार असतील, तर त्यांना सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आग्रह करू शकत नाही, असे निकम यांनी म्हटले.