Sachin Waze On Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर दबाव आणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकणार होते असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. अशातच आता मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक असे आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, असे सचिन वाझेने म्हटलं आहे.
मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेने पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला. सचिन वाझेनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिली आहेत. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप वाझेने केला.
अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना सचिन वाझेने अडचणीत आलं आहे. सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सचिन वाझेला रुग्णालयात नेत असताना त्याने ‘एएनआय’ला दिलेल्या प्रतिक्रियेत देशमुखांवर गंभीर आरोप केले.
“जे काही घडलं आहे त्याचे सर्व पुरावे आहेत. ते (अनिल देशमुख) त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याबाबत ‘सीबीआय’कडेही पुरावे आहेत. मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं आहे. हे सर्व प्रकरण (अनिल देशमुख) त्यांच्या विरोधात गेलेलं आहे. तसेच मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. मी एक लेटर लिहिलं आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचंही नाव आहे”, असे सचिन वाझेने म्हटलं आहे.
दरम्यान, अनिल देशमुख आणि सचिन वाझेने केलेल्या आरोपांना राजकीय आणि कायदेशीर किनार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वाझेचे आरोप नवीन नाहीत असं म्हटलं आहे. "अनिल देशमुख जेव्हा आत गेले तेव्हा त्यांचे पीएदेखील आत गेले. यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख, उद्धव ठाकरे यांची गँग सत्तेत असताना जनतेची लूट करत होती. वसुली करणे हेच या लोकांचे काम होतं. १२ अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी गोंधळ घातला होता. वाझेनी काहीही नवे सांगितले नाही. उद्धव ठाकरेंना वाझे कशाला भेटत होते याचाही खुलासा व्हायला हवा, असे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.