मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 ते 27 फेब्रुवारीदरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात ते अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटले, असे मला वाटते. असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात शरद पवार यांनाही चुकीची माहिती देण्यात आली. परिणामी त्यांच्याकडूनही चुकीची माहिती पत्रकारांना दिली गेली. यामुळे आता देशमुख एक्सपोझ झाले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Anil Deshmukh was not isolated on February 15 says Devendra Fadnavis )
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. यासंदर्भात पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन, परमबीर सिंगांनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हणत, परमबीर सिंग सांगत आहेत त्या काळात देशमुख कोरोनामुळे क्वारंटाइन होते, असे म्हटले होते. मात्र, यानंतर फडणवीस यांनी एक ट्विट करून पवारांच्या दाव्यांचीही पोलखोल केली होती.
"नमस्कार, मला क्षमा करा", फडणवीसांनी माफी मागून केली पत्रकार परिषदेची सुरुवात कारण...
पोलिसांच्या दैनंदिन कार्यक्रमानुसार देशमुख मुंबईतच -यावेळी फडणवीस 15 तारखेची गृहमंत्र्यांची कार्यक्रम पत्रिका दाखवत म्हणाले, 15 तारखेला ते (देशमुख) एका खासगी विमानाने आले होते. 15 तारखेपासून ते आपल्या घरी होते. मात्र, माझ्याकडे पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा कागद आहे. यानुसार, 17 फेब्रुवारी एक तारीख आहे. यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत. तर अनिल देशमुख हे दुपारी 3 वाजता सह्याद्रीला येतील, असे म्हटले आहे. यानंतर 24 तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे 11 वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याची पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच, असा माझा दावा नाही, असेही फडणवीस म्हणाले.
15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते, अनेकांना भेटले - काल पवारांना योग्य ब्रिफिंग देण्यात आले नाही. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली आणि देशमुखांना प्रोटेक्ट केले गेले. यामुळे ते एक्सपोझ झाले आहेत. मला वाटते, की देशमूख हे 15 ते 27 फेब्रुवारीदरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात ते अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.'क्वारन्टाइन'वरून अनिल देशमुख अडचणीत; १५ फेब्रुवारीच्या 'त्या' नागपूर-मुंबई विमान प्रवासावर दिलं 'स्पष्टीकरण'
तत्पूर्वी, पत्रकार परिषदेला सुरुवात करताना, आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवा करतो आहे. त्यानंतर मराठीत बोलेले, असे फडणवीस म्हणाले. यावर काही जण इंग्रजी-इंग्रजी, असे म्हणाले. त्यावर त्यांच्या एवढे (शरद पवार) माझे इंग्रजी चांगले नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलतो, अशी कोपरखळीही अप्रत्यक्षपणे पवारांना मारली.