मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्दांचे खेळ करतात, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता. तर याच मुद्यावरून आता भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून, फडणवीसांच्या लबाडीच्या वागण्यामुळेच मी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता, असे ते म्हणाले आहे.
अनिल गोटे यांनी एक पत्रक काढले असून त्यात म्हंटले आहे की, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवणुक केल्याचा खुला आरोप उध्दव ठाकरे यांनी केला आहे. मात्र याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण माझा स्वतःचा अनुभव या पेक्षा वेगळा नसल्याचे गोटे म्हणाले.
तसेच देवेंद्र फडणवीसांच्या अशा लबाडीच्या वागण्यामुळेच मी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडलो होतो.फडणवीस यांच्याकडून सत्याची अपेक्षा करणे म्हणजे धोत्र्याच्या फुलाकडून गुलाबाची अपेक्षा करणे, असंही अनिल गोटे यावेळी म्हणाले.
भाजप-शिवसेनामधील सत्तेस्थापनेसाठी सुरू असलेला वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून भाजपला सत्तेस्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आले असल्याने, राजकीय घडामोडींना वेग आले आहे. त्यामुळे आता भाजप याविषयी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.