मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी सार्वजिनक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव अनिलकुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड हे राधेश्याम मोपलवार यांची जागा घेतील.
मोपलवार हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते निवृत्त झाले. पण युती सरकार, महाविकास आघाडी सरकार आणि सध्याच्या महायुती सरकारनेही त्यांना या पदावर कायम ठेवले. समृद्धी महामार्गाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. एमएसआरडीसीतून ते जात असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीसाठी त्यांच्या कार्यालयात उभारण्यात आलेल्या वॉर रुमच्या महासंचालक पदावर मोपलवार कायम राहतील.
आयएएस अधिकाऱ्यांनी दर्शवला विरोधअनिलकुमार गायकवाड हे दीर्घकाळ सार्वजनिक बांधकाम विभागात राहिले. सचिव पदावरून २०२१ मध्ये ते निवृत्त झाले. एमएसआरडीसीमध्ये सहव्यवस्थापकीय संचालकपदी ते आधीपासूनच कार्यरत आहेत. एमएसआरडीसीमध्ये त्यांना उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्याच्या निर्णयाला मंत्रालयातील आयएएस अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला अशी माहिती आहे. काही अधिकारी या संदर्भात सकाळी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना भेटले व त्यांनी नापसंती व्यक्त केली. आयएएससाठी असलेल्या पदावर बिगर आयएएस अधिकारी कशाला असा सूर त्यांनी लावला.