मुंबई : गोरेगावच्या (मुंबई) दादासाहेब फाळके चित्रनगरीतील २० एकर जागा ही नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स फॉर अॅनिमेशन,व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग अँड कॉमिकच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. अॅनिमेशन व संलग्न क्षेत्रासाठीचे कौशल्य प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाईल. या संकुलात पदवी, पदव्युत्तर शिक्षण,संशोधन आदी सुविधा देण्यासह उद्योजकांचा सहभाग घेण्यात येणार असून त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे हे संकुल उभारले जाणार आहे.
बोदवड उपसासिंचनसाठी २१७८ कोटी रु.मंजूर जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील ५३ हजार ४४९ हेक्टरचे कृषी सिंचन करणाऱ्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या २ हजार १७८ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पिहल्या ६५० कोटीच्या टप्प्यामुळे जळगावमधील ८ हजार ५५९ हेक्टर आणि बुलढाणा जिल्ह्यातील ६ हजार ४३५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. १ हजार ५२८ कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यामुळे जळगाव जिल्ह्यातील २५ हजार ११० तर बुलडाणा जिल्ह्यातील १३ हजार ३४५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बोदवड व मुक्ताईनगर तर बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा आणि मलकापूर या तालुक्यांना सदर योजनेचा लाभ होणार आहे. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पंपगृह १अ, पंपगृह १ब, जुनोने साठवण तलावाचे ३०१ मीटर पर्यंतचे काम व उद्धरण नलिकेची एक रांग ही कामे पूर्ण करून १४ हजार ९९४ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच या योजनेच्या कामासाठी केंद्र शासनाकडून मिळालेले अर्थसहाय्य राज्यपालांच्या सुत्राबाहेर ठेवण्यासाठी राज्यपाल महोदयांना शिफारस करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. (प्रतिनिधी)राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव होणारराज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये (मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळून) कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक महोत्सवासाठी २० लाख रुपयांचा निधी शासन देणार आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राची माहिती, मार्गदर्शन, प्रदर्शनांचे आयोजन त्या अंतर्गत केले जाईल.