Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे. अंजली दमानिया यांनी एक एक ट्विट केले आहे. यातील एका व्हिडिओवरून दमानिया यांनी चित्रा वाघ यांना थेट प्रश्न विचारत चांगलेच सुनावल्याचे सांगितले जात आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील खडाजंगी तीव्र होत असून, उर्फीच्या नंगटपणाविरोधात तिच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. मात्र, आपल्या पेहरावाबाबत उर्फी जावेद ठाम आहे. यातच, अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ ट्विट करून चित्रा वाघ यांना सवाल केला आहे.
याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?
अंजली दमानिया आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, प्रिय चित्राताई वाघ, भाजपच्या श्री रमेश बिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का? अशी विचारणा दमानिया यांनी चित्रा वाघ यांना केली आहे. तत्पूर्वी, राजस्थानच्या अलवरमध्ये भाजपची जनआक्रोश महासभा पार पडली. या सभेत काही महिलांना नाचवण्यात आले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडिओ रिट्विट करून अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. ती बघून दु:ख झाले. मला त्यांच्याबद्दल आदर होता. संजय राठोडांविरोधात त्या लढल्या होत्या. राजकारणात कमबॅक करण्याचा किंवा स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा किंवा मंत्रीपद मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेऊन कंगना रणौत, केतकी चितळे आणि अमृता फडणवीस यांच्या पेहराववरून चित्रा वाघ यांना घेरले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"