Beed Sarpanch Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड याच्या अटकेमुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवलाय. अशातच धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांना समर्थन दिल्याने अंजली दमानिया यांनी त्यांना या प्रकरणाची माहिती नसल्याचे म्हटलं.
महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे. धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. तसेच जातीय सलोखा राखण्यासाठी सहकार्य करा असंही नामदेव शास्त्री यांनी म्हटलं. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणं ही भित्री पद्धत असल्याचेही शास्त्री म्हणाले, जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना या प्रकरणांमध्ये गोवलं जात आहे असा आरोपही नामदेव शास्त्री यांनी केला. जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना त्रास दिला जात आहे असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी त्यांची पाठराखण केली. यावरुन एबीपी माझासोबत बोलताना अंजली दमानिया यांनी नामदेव शास्त्रींना याबाबत माहिती नसेल असं म्हटलं.
"भगवानगड हे अतिशय पवित्र स्थान आहे आणि तिथून राजकारण्यांबद्दल बोलण्याची काही गरज नव्हती. नामदेव शास्त्री यांना या प्रकरणाची पूर्ण कल्पना नाही असं मला वाटतं. त्यांनी पेपर बघितलेले नाहीत त्यांनी जे घोटाळे झालेत ते देखील त्यांनी पाहिलेले नाहीत. आपण कोणीच आरोप करत नाही आहोत. आपण फक्त हकीकत मांडत आहोत. ती कदाचित नामदेव शास्त्री यांना माहिती नसेल म्हणून ते असं बोलले असतील," असं अंजली दमानिया म्हणाल्या.
"प्रत्येक माणूस मंदिरात सूचिर्भूत होऊ जातो. पण, भगवान गडावर जाताना असलेले धनजंय मुंडे आणि प्रत्यक्षातील धनंजय मुंडे हे प्रचंड वेगळे असावेत. पण धनजंय मुंडे आणि त्यांचे सहकारी काय करतात याची नामदेव शास्त्रींना माहिती नसेल. त्यांना मुंडेचा काळी बाजू माहिती नसेल. ते पवित्र ठिकाणी राहतात त्यांना ग्राऊंड रिअॅलिटी माहिती नसावी. त्यामुळे नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घ्यायला नव्हती पाहिजे. उद्या आणि परवा मी या प्रकरणात आणखी मोठा खुलासा करणार आहे. मी त्यांची भेट घेऊन माझ्याकडे असलेले सर्व पुरावे त्यांना दाखवेन," असंही अंजली दमानियांनी म्हटलं.