Anjali Damania on Surach Chavan Accusation: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं आहे. अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतरही अंजली दमानिया यांचे आरोपाचे सत्र सुरुच आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने अंजली दमानिया यांच्यावर आरोप करत त्याचा पुराव्यांसह खुलासा करणार असल्याचे म्हटलं. यावरुन आता अंजली दमानिया संतप्त झाल्या आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या खात्यावर २५ कोटींचा बॅलन्स टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे. कोणाच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे टाकण्यात आले हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू, असा इशारा सूरज चव्हाण यांनी दिला. सूरज चव्हाण यांच्या आरोपांवर आता अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. खूप राग आला आहे पण माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी बँक खाती तपासावीत असंही अंजली दमानियांनी म्हटलं.
"खूप राग आला आहे तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवारांना माझे थेट आवाहन. ताबडतोब माझी सगळीच्या सगळी खाती सरकारने तपासावी. कुठेही एक दमडी देखील बेहिशेबी आहे का ते पाहावे. इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार? राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना? योग्य आहे हे? जर महाराष्ट्राच्या मीडियाला माझ्या लढ्याबद्दल जरा पण आदर असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची ह्यावर आजच्या आज प्रतिक्रिया घ्यावी. दोघांन माझी विनंती, माझी ताबडतोब चौकशी करावी, माझे सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी," असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
सूरज चव्हाणांनी काय म्हटलंय?
"धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर २५ खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला १५ देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू," असा इशारा सूरज चव्हाण यांनी दिला आहे.