"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:38 PM2024-05-30T13:38:05+5:302024-05-30T13:41:45+5:30
पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप लावले होते. त्याला उत्तर देताना अजितदादांनी मी नार्को टेस्टला तयार आहे असं प्रतिआव्हान दिलं होते. त्यानंतर आता पुन्हा दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
मुंबई - Anjali Damania on Ajit Pawar ( Marathi News ) अजित पवार नार्को टेस्ट करायला तयार आहेत हे ऐकून बरं वाटलं. मी सन्यास घ्यावा, घरात बसावं हे त्यांनी मला चॅलेंज दिलं. मी अगदी गप्प बसायला तयार आहे. राजकारणात मी नाहीच, पण समाजकारणातून मी पूर्णपणे संन्यास घ्यायला तयार आहे. पण नार्को टेस्ट होणार नाही याची मला खात्री आहे. अजित पवारांनी ही नार्को टेस्ट जरूर करावी. उद्या नाही तर आज करावी. जर त्या टेस्टमध्ये ते दोषी आढळले नाही तर मी गप्प घरी बसायला आणि समाजकारणातून संन्यास घ्यायला १ मिनिटात तयार आहे. ते लिहूनही द्यायला तयार आहे असं प्रतिआव्हान अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, मी कधीही पुराव्याशिवाय काम करत नाही हे अजित पवारांनाही माहिती आहे. ठोस पुरावे मी २ दिवसात बाहेर काढेन. अजित पवारांना जे जे आतापर्यंत बचाव करत होते, त्यांनी आता १ फोन केला वैगेरे म्हटलंय. एका इंग्रजी माध्यमांशी पोलीस आयुक्तांची मुलाखत घेतली. अजित पवार आणि पुणे पोलीस आयुक्तांमध्ये अनेक कॉल्स झाले. त्यावरही मी ट्विट केलं आहे. जर इतक्या वेळा अजित पवारांचे फोन कॉल्स पोलीस आयुक्तांना झाले असतील तर ही गोष्ट त्यांनी माध्यमांपासून का लपवली. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हावी असं वाटत होतं, मग पालकमंत्र्यांनी निदान २४ तासांत माध्यमांशी संवाद साधायला हवा होता. ४ दिवस ते बोलले नव्हते. मग आयुक्तांना इतक्या वेळा फोन कॉल्स झाले, ते दोषीला आतमध्ये टाकण्यासाठी की वाचवण्यासाठी..याचा खुलासा पुणे पोलीस आयुक्तांनी केलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
तसेच अजित पवारांची नार्को टेस्ट लवकरच झाली तर बरे होईल. जर नाही झाली तर अजित पवारांचे आणि अग्रवाल कुटुंबाचे काय कनेक्शन आहेत ते लवकरच बाहेर येईल. २ दिवसांत मी बाहेर काढेन. माझा लढा काँग्रेसविरोधात झाला होता. सिंचन घोटाळ्यापासून राष्ट्रवादीविरोधात लढा झाला. एकापाठोपाठ एक घोटाळे त्यांनी केले, मी उघड केले त्याला काय करणार?. सगळ्यात जास्त घोटाळे त्यांनी केले आहेत. मी नितीन गडकरींविरोधात लढले जेव्हा ते भाजपा अध्यक्ष होते. खडसेंविरोधात लढले. ते भाजपाचे मंत्री होते. काही तरी लोकांमध्ये पिल्लू सोडायचे असं करून संभ्रम निर्माण केले जातायेत. आरोप करणाऱ्यांच्या डोक्यात दोष आहे. त्यांना चांगले सुचू शकत नाही. एखादी बाई सिद्धातांवर देशासाठी लढू शकते हे त्यांच्या मंदबुद्धीला कळणारही नाही असा पलटवार अंजली दमानिया यांनी टीका करणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांवर केला आहे.
दरम्यान, मी चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांना मेसेज पाठवले. तुमच्या पक्षातील लोक माझ्याविरुद्ध असं बोलू कसं शकतात? यावर तुम्हाला काही वाटत नाही का?. ते कोणालाही रिचार्जवर चालणारी बाई बोलू शकतात का? कोण आहे सूरज चव्हाण, असं कसं बोलू शकतात? सुप्रिया सुळेंनाही मी ट्विट केले होते. इतरवेळी तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता, पुरोगामी महाराष्ट्र बोलत असतात, आज माझ्यावर अशी टीका केली त्यावर कुणाला बोलावं वाटत नाही ही शोकांतिका आहे अशी संतप्त प्रतिक्रियाही अंजली दमानिया यांनी दिली.