Anjali Damania News: बीड कारागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला मारहाण झाल्याचा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला. परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांचा दावा आहे. याच रागातून महादेव गित्ते याने आता तुरुंगात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचे मला कळाले, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. तुरुंग प्रशासनाने सदर दावे फेटाळले असले तरी यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली.
सकाळच्या सुमारास महादेव गित्ते आणि सोनावणे-फड टोळीत फोन करण्यावरून वाद झाला. नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. गित्ते आणि या टोळीत वाद झाला असला तरी या घटनेशी वाल्मीक कराड याचा काहीही संबंध नाही. सदर घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही किंवा कोणालाही इजा नाही, अशी माहिती बीड कारागृहाचे पोलीस महासंचालक जालिंदर सुपेकर यांनी दिली. यानंतर आता अंजली दमानिया यांनी यावर भाष्य केले आहे.
बीडमधील कायदा-सुव्यवस्थेचा अभाव पुन्हा अधोरेखित
वाल्मीक कराडला व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट मिळावी, यासाठी महादेव गित्तेला तिथून हलवले आहे. मला जी माहिती मिळाली. त्यानुसार, बीडच्या जेलमध्ये जोरात भांडणे झाली. त्यामध्ये, एक-दोन चापटा वाल्मीक कराडला मारण्यात आल्या आहेत. येथील दोन गटांत असलेली टोकाची भांडणे पुढे येत आहेत. त्यामुळे, बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा अभाव आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत, याची काळजी सरकारने घ्यायला हवी, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या करण्यात आलेला धक्कादायक प्रकार आला आहे. यावर बोलताना अंजली दमानिया यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांचे नाव कुठे येऊ नये, यासाठी हे प्रकरण दाबायचा प्रयत्न सुरू आहे. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी वाल्मीक कराड हे सर्व करणार होते. त्या बाईंना तयार ठेवण्यात आले होते. संतोष देशमुखांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा प्राण गेला आणि मग रस्त्यात फेकून ती मंडळी गायब झाली होती. खरेतर संतोष देशमुखांना त्या बाईकडे नेऊन त्यांना एका गुन्ह्यात अडकवण्याचा त्यांचा प्लॅन होता, असे सांगितले जात आहे, असा दावा दमानिया यांनी केला.