मुंबई - आज भाजपाच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा माणसांना मंत्रिपद कसं देऊ शकतात? असं म्हटलं आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला मंत्रिपद मिळालेलं नाही. यावरूनही निशाणा साधला आहे. "एकही स्त्री मंत्रिपदासाठी योग्य नाही?" असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतेलेल्या दोन मंत्र्यांवर आक्षेप घेतला आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झालेले आणि त्यामुळेच ठाकरे सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांचा नव्या सरकारमध्ये समावेश झाल्यामुळे दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच अब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्र टीईटी घोटाळा प्रकरणात रद्द झाल्यामुळे त्यांच्याही नावावरूनही दमानिया यांनी हल्लाबोल केला आहे. अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच एका माळेचे मणी म्हणत टीका केली आहे.
"2 नावं बघून वाईट वाटलं, परत ये रे माझ्या मागल्या, एका माळेचे मणी"
"दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी" असं अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी एक ट्विट केलं आहे.
"पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी"
"पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी" असं म्हटलं आहे. तसेच लडेंगे… .जितेंगे असंही त्यांनी सांगितलं. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.