मुंबई - राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर पवार समर्थकांनी ‘बारामती बंद’ची हाक दिली आहे. त्यांनतर यावर प्रतिक्रिया देतांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बारामती बंदला ट्विटरवरुन विरोध करत 'चोर तो चोर वर शिरजोर' म्हंटले होते. मात्र आता पवारांवरील 'ईडी'ची कारवाई सूडबुद्धीनेचं करण्यात आली असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
पवार यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही सूडबुद्धीनेचं करण्यात आली असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. तर आघाडी सरकारच्या काळात सुद्धा अशा सूडबुद्धीने कारवाया झाल्या असल्याचे सुद्धा त्या म्हणाल्या. तर मध्यवर्ती शिखर बॅँकेच्या संचालक मंडळावर शरद पवार नसताना त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला याचा खुलासा 'ईडी'ने करावा. तसेच निवडणुकीच्या तोंडावर सीबीआय, ईडी,एसीबी यांचा वापर केला जात आहे. तर भाजपकडून मात्र याचा सर्रास वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा दमानिया यांनी केला. त्यामुळे दमानिया यांना उशिरा उपरती झाली असल्याची चर्चा आहे.
राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यांनतर, राजकीय वातावरण तापले आहे. तर राजकीय वर्गातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. याच प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी बारामती बंद करणं हास्यास्पद असून, 'चोर तो चोर वर शिरजोर' असं म्हणत बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतोय? मात्र त्यामुळे तुम्ही बारामतीपुरते मर्यादित आहेत हे सिद्ध होते अशी टीका केली होती.