राळेगणसिद्धी : लोकपाल कायद्यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी अण्णा हजारे यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, अण्णा उपोषणावर ठाम राहिले असून चर्चा अर्धवटच सोडून निघून गेले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारकडून उपेक्षा झाल्यानंतर अण्णा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली. आज दुपारी राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी राज्य सरकारचे पत्र त्यांच्या हाती सोपवले. तसेच सायंकाळी अण्णा यांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले.
अण्णा याच्याशी दोन्ही मंत्र्यांनी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघाला नाही. यामुळे अण्णा उपोषणावर ठाम राहिले असून चर्चेतून उठून ग्रामसभेला रवाना झाले. अण्णा व महाजन यांच्यामध्ये याआधी साडेतीन तास चर्चा झाली. तर भामरे यांच्याशी अर्धा तास चर्चा झाली. दोन्ही मंत्री राळेगणसिद्धीमध्ये बसून आहेत.
यानंतर पत्रकारांना भामरे यांनी सांगितले की, अण्णा हजारे यांच्याशी समाधानकारक चर्चा झाली. केंद्राचा प्रतिनिधी म्हणून आलो. सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. उद्यापर्यंत स्पष्ट होईल. स्वामीनाथन आयोगावरही चर्चा झाली. चर्चेचा तपशील केंद्राकडे पोहोचविण्यात येईल.