मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन होत आहे. आंदोलन करताना अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आंदोलनात हिंसाचार करणं हे चुकीचं आहे, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात लोकं रस्त्यांवर उतरली आहे. तर गुरुवारी लखनौ, अहमदाबादसहित अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी यावेळी तोडफोड करत बसेस, दुचाकी व चारचाकी वाहने पेटवून दिली. तर पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली.
मात्र देशात होत असलेल्या या हिंसक आंदोलनाला अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. आंदोलन करणं दोष नसून तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र आंदोलनात हिंसाचार करणं हे चुकीचं आहे, असं अण्णा हजारे म्हणाले.
देशात होत असलेले हिसंक आंदोलने देशासाठी योग्य नाही. आंदोलन करावं, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु या आंदोलनात हिंसा, तोड-फोड किंवा जाळपोळ करणे हे चुकीचं आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले. देशातील महिला सुरक्षेवरून अण्णा हजारे आजपासून मौनव्रत पाळणार आहेत. त्याआधी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.