नंदकिशोर नारे,ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २२ - वाशिम जिल्हयात प्रसिध्द असलेल्या ‘वाशिम सायकलस्वार’ गृपने वाशिम ते कन्याकुमारीसह विविध सायकलने प्रवास करुन वाढत्या प्रदूषणाबाबत जनजागृती केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवामध्ये या गृपमधील काही युवक वाशिम ते लालबागचा राजा दर्शनासाठी गेले होते. या दरम्यान त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था समाजसेवक अण्णा हजारे यांनी करुन त्यांच्यासोबत ‘वाढत्या प्रदूषण’ावर तासभर चर्चा करुन वाशिम सायकलस्वाराचे कौतूक केले.
वाशिम सायकलस्वार गृपमधील नारायण व्यास, महेश धोंगडे हे गणेशोत्सव दरम्यान वाशिम ते मुंबई सायकल प्रवास केला. यावेळी त्यांची समाजसेवक अण्णा हजारे, मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार नाना पाटेकर, अजय देवगण व अभिनेत्री अनिताराज यांची भेट झाली. यावेळी सर्व मान्यवरांनी वाशिम सायकलस्वार प्रदूषणाबाबत करीत असलेल्या जनजागृतीचे कौतूक केले. राळेगणसिध्दी येथे अण्णा हजारेंनी तर या सदस्यांशी तासभर चर्चा करुन वाशिम सायकलस्वार गृप समाजाला एक चांगला संदेश देत आहे. सायकलने प्रवास करणे ही सामान्य गोष्ट नाही, वाहनातील धुरामुळे पर्यावरणावर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे. या वाहनातील धुरामुळे कोटी टन कॉर्बनडाय आॅक्साईड बाहेर निघून प्रदूषण निर्माण होत आहे. यामुळे माणसांच्या आजारांमध्ये वाढ, प्राणीमात्रांच्या जिवनावर धोका निर्माण झाला आहे. यासह विविध विषयांवर तासभर चर्चा केली. या प्रवासादरम्यान नाना पाटेकर यांच्या जुन्या ‘माहिम’ या राहत्या घरी या सदस्यांसोबत चहा व नाश्ता करुन त्यांच्या उपक्रमाचे कौतूक केले. तसेच जुहू येथील अजय देवगण यांच्या कार्यालयात तर बांद्रा परिसरात अनिताराज यांची भेट झाली असता त्यांनी सुध्दा या युवकांचे कौतूक केले. वाशिम येथील या सायकलस्वार गृपमध्ये तहसीलदार, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, विधिज्ञ मंडळासह नामांकीत नागरिकांचा समावेश तर आहेच शिवाय ४ महिलांसह ६० सदस्यांचा गृप आहे. या गृपव्दारे प्रदूषणाबाबत होत असलेल्या जनजागृतीचे सर्वत्र कौतूक होतांना दिसून येत आहे.