नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा विराजमान होणार आहे. रामलीला मैदानावर केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यांसाठी केजरीवाल यांनी अनेक नामवंतांना आमंत्रित केले आहे. मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केजरीवाल यांच्या शपथ सोहळ्याचे अद्याप आमंत्रण मिळाले नाही.
अण्णा हजारे यांच्यासोबतीने केजरीवाल यांनी देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळाच्या शपथविधीसाठी अण्णा यांना आमंत्रण दिले होते. मात्र प्रकृती ठिक नसल्याचे सांगत अण्णांना कार्यक्रमाला येणे टाळले होते. मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल अण्णांनी केजरीवालांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी अण्णांना फोन केला होता. मात्र त्यांनी फोनला काहीही उत्तर दिले नव्हते, असंही सुत्राने सांगितले.
दरम्यान यावेळी अण्णांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आलेले नाही. या संदर्भात केजरीवाल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या सचिवाने केजरीवाल सध्या माध्यमांशी बोलणार नसल्याचे म्हटले. तर अण्णा यांना देखील केजरीवाल यांच्या शपथग्रहण सोहळ्याविषयी विचारण्यात आले. त्यावर अण्णांनी काहीही उत्तर न देता स्मितहास्य केले.
दुसरीकडे अण्णांचे सचिव संजय पठाडे यांनी म्हटले की, दिल्लीत केजरीवाल यांची पुन्हा सत्ता आली आहे. मात्र यावर अण्णा काहीही प्रतिक्रिया देणार नाही. गांधी विचारांच्या अण्णांनी 20 डिसेंबरपासून मौन धारण केल्याचे त्यांनी सांगितले.