Anna Hazare on Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ताशेरे ओढत राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मणिपूरच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, मणिपूरच्या महिलांवर जे अन्याय अत्याचार झाले अशा नराधमांना फाशीवर लटकवायला पाहिजे. मी तर म्हणेन की या घटनेमध्ये याची गरज आहे. स्त्री आपली आई आहे, बहीण आहे. विशेषतः जे देशाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असतात. अशा एका जवानाच्या पत्नीवर असा अन्याय-अत्याचार होतो, हे अजूनच गंभीर आहे, या शब्दांत अण्णा हजारे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
मानवतेला लागलेला खूप मोठा कलंक
मणिपूरमध्ये घडलेल्या या घटना म्हणजे मानवतेला लागलेला खूप मोठा कलंक आहे, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली. तसेच विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशातच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची दखल घेतली आहे. पण, ही घटना घडली आहे आणि खूपच निंदनीय आहे, असे ब्रीजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.