पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप केला होता. त्याबाबत अण्णा हजारे यांच्यावतीने बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठविण्यात आली आहे.
नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हजारे संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता. त्यावर हजारे यांच्या समर्थकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गुरूवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हजारे यांनी भेटही नाकारली होती. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली होती.
मलिक यांच्या त्या वक्तव्याशी पक्षाचा काही संबंध नाही. यामुळे हजारे दुखावले गेल्याने आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे अजित पवार सांगितले होते. मात्र, नवाब मलिक यांनी यावर कोणतेही मत व्यक्त केले नाही. त्यामुळे अण्णा हजारे यांची वकील मिलिंद पवार यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या नोटीशीत त्यांनी म्हटले आहे की, लोकपाल व लोकआयुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संमत होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे हे राळेगण सिध्दी येथे ३० जानेवारी २०१९ पासून बेमुदत आमरण उपोषणासाठी संत यादवबाबा मंदिरात बसले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हजारे यांनी शेतक-यांसाठी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी व्हावी. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा या मागण्या करीत तबल्ल ३८ वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांच्या पत्रांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबविले व हजारे यांच्या मागण्यांना उत्तर देण्याचे मोदींनी टाळले.
अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर नुकतेच अण्णा हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ‘अण्णा हजारे हे संघ परिवारा कडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकिलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात’ अशी बदनामी कारक व धादांत खोटी वक्तव्ये एका वृत्त चित्रवाहिनीवर चर्चा करताना केली व त्यानंतर १ फेब्रुवारी २००९ रोजी तातडीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब नवाब यांनी केलेल्या बदनामीकारक वक्तव्यांची अण्णा हजारे यांची माफी मागून दिलगीरी व्यक्त केली होती.
परंतु अद्याप स्वत: नवाब मलिक यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्या विषयी कुठलाही खुलासा केलेला नाही. त्यामुळे ते वक्तव्य त्यांचे वैयक्तिक होते किंवा पक्षाचे होते तसेच नवाब मलिक यांच्याकडे कुठलाही पुरावे नसताना धादांत खोटे व बदनामीकारक व्यक्तव्य होते. फक्त राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक अण्णा हजारे यांच्या विषयी बदनामी करण्याचे उद्देशाने व अण्णांविषयी समाजात चुकीचा समज निर्माण व्हावा म्हणून नवाब मलिक यांनी वरील वक्तव्य केल्याने अण्णा हजारे यांनी त्यांचे वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांच्यावतीने नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
नोटीस पाठवून अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांनी जाहीर लेखी माफी मागावी व तसा खुलासा करावा तसे न केल्यास फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे खटले व दावे मलिक यांच्या विरोधात दाखल करावे लागतील, असा इशारा कायदेशीर नोटीस रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून नवाब मलिक यांना दिली आहे.