Anna Hazare Vs Jitendra Awhad: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली. या टीकेला अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आंदोलनांपासून काहीसे दूर असल्याचे चित्र आहे. नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवत भाजपच्या काळात त्यांच्यावर शांत बसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर अण्णा हजारे यांचा एक फोटो शेअर करत टीका केली. “ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही”, या शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडले. यावर अण्णा हजारे यांनी भाष्य करताना मानहानीचा दावा करणार असल्याचे म्हटले आहे.
माझ्यामुळे देशातील नागरिकांचे भले झाले
माझ्यामुळे देशाचा वाटोळ झाले नाही. माझ्या आंदोलनामुळे अनेक देशहिताचे कायदे झाले. माझ्यामुळे देशातील नागरिकांचे भले झाले. मी देशभरात फिरत असताना माहिती अधिकार कायद्याबाबत लोक मला चांगल्या प्रतिक्रिया देतात. मात्र अनेक पक्ष कार्यकर्त्यांचे वाटोळे झाले असल्याचे नाकारता येत नाही. काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले, याची खंत त्यांच्या मनामध्ये असावी. यावर वकीलांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.
दरम्यान, या आधीही अण्णा हजारेंच्यावर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही आरोप केले होते. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यांच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आपली भूमिका जाहीर करून एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. मणिपूर विषयावरती अख्खा देश जागा झाला आहे, पण त्यावर अण्णा हजारे यानी कोणतीही भूमिका घेतली नाही, एक शब्दही बोलले नाहीत. आम्ही वाट बघत होती अण्णा कधी बोलणार, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक टीका केली होती.