राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव देण्याचे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिले आहे. हमीभाव मिळाल्यास त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. पुढील काळात शेतकºयांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.नवी दिल्ली येथे रामलीला मैदानावर सात दिवसांच्या उपोषणाच्या सांगतेनंतर अण्णा शनिवारी राळेगणसिद्धी येथे आले. ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. अण्णांनी संत यादवबाबा यांचे दर्शन घेतले. अण्णांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.राळेगणसिद्धीकडे येताना पुणे विमानतळ, वाघोली, रांजणगाव गणपती, वाडेगव्हाण येथेही नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सरपंच रोहिणी गाजरे, माजी सरपंच मंगल मापारी, सीमा औटी आदींनी अण्णांचे औंक्षण केले. हजारे म्हणाले, रामलीला मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी परिवाराने सात दिवस वेगवेगळे उपक्रम राबवून साथ दिली. त्यामुळे मला आंदोलनासाठी मोठी उर्जा मिळाली. एका गावाची ताकद काय असते, हे राळेगणसिद्धीने भारत सरकारला दाखवून दिले.शेतकºयांच्या पिकाला मोबदला मिळत नसल्याने आत्महत्या वाढल्या. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला तर या आत्महत्या थांबतील. दुधालाही चांगला भाव मिळायला हवा, असे ते म्हणाले. हजारे यांनी दिवसभर संत यादवबाबा मंदिरात विश्रांती घेतली. सायंकाळी ग्रामसभेत विजयोत्सव साजरा करण्यात आला. माजी सरपंच जयसिंग मापारी, रमेश औटी, विलास औटी, गणपत पठारे, सुरेश पठारे आदी उपस्थित केले.
दीडपट हमीभाव देण्याचे केंद्राचे लेखी आश्वासन- अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:28 AM