आॅनलाइन लोकमतपारनेर (अहमदनगर), दि़ ७ - सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढून बुद्धी पालटली आहे. सत्तेची नशा मिळवण्यासाठीच केजरीवालांसारखे जनतेला ‘अण्णा माझे गुरू आहेत,’असे सांगत होते, हे माझ्या आता लक्षात आले आहे. केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील शुंगलू समितीने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने व केजरीवाल यांचे शुद्ध आचार, विचार संपून जीवन दागी बनले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारभारावर शुंगलू समितीने गैरव्यवहारांचा ठपका ठेवला आहे़ यामुळे केजरीवाल अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर पत्रकाद्वारे कडक शब्दांत टीका केली. केजरीवाल यांच्यावर शुंगलू समितीने केलेल्या आरोपांमुळे मला अतिशय दु:ख झाले. मला वाटले होते, केजरीवाल यांच्यासारखे युवक समाजासाठी उभे राहिल्यास देशात चांगली कामे होतील, परंतु केजरीवाल यांनी माझे हे स्वप्नच भंग करून टाकले आहे. केजरीवाल यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला; तेव्हाच मला देवाने सुबुद्धी दिली होती, की तुम्ही पक्षात जाऊ नका. केजरीवाल यांच्याबरोबर तुमचीही बदनामी होईल, म्हणून मी कायम पक्ष व पार्ट्यांपासून दूर राहिलो आहे. देश कायद्याच्या आधारावर चालत आला आहे, तरी पण केजरीवाल कायदा मोडत आहेत, हे खूप दु:खदायक असून, यात मी अरविंद यांचे कधीही समर्थन करणार नाही़ उलट देश व समाजाला कमजोर बनवण्याच्या प्रयत्न केला म्हणून केजरीवाल यांचा मी निषेध करतो, असेही अण्णांनी पत्रकात म्हटले आहे. आम्ही आंदोलनात असताना अरविंद यांना सातत्याने शुद्ध आचार, शुद्ध विचार, जीवनात त्याग, अपमान पचविण्याची ताकद, निष्कलंक जीवन ही पाच तत्त्वे सांगत होतो, परंतु आता केजरीवाल यांच्यात शुद्ध आचार व शुद्ध विचार व त्याग यापैकी काहीच राहिले नसून, दागी जीवन बनले आहे, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
अण्णा म्हणाले, केजरीवाल यांचे जीवन कलंकित
By admin | Published: April 07, 2017 5:16 PM