पारनेर (जि.अहमदनगर) : विदेशातील काळा पैसा देशात परत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास सामान्य जनतेने पुकारलेल्या लढय़ात एक शिपाई म्हणून आपण सहभागी होऊ, असे जाहीर करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकप्रकारे मोदी सरकारविरोधात अप्रत्यक्ष संघर्षाचे बिगूल फुंकले आहे.
शंभर दिवसांत परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा करणा:या मोदी सरकारने दीडशे दिवसानंतर केवळ तीन लोकांची नावे जाहीर केल्याबद्दल त्यांनी खेदयुक्त आश्चर्य व्यक्त केले आहे.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले, भाजपाच्या हाती सत्ता दिल्यानंतर शंभर दिवसांत विदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु त्यांचे सरकार सत्तेवर येऊन दीडशे दिवस लोटल्यानंतर केवळ तीन लोकांची नावे जाहीर करण्यात आली व आठ लोकांची यादी तयार असल्याचे सांगण्यात आले.
विदेशात काळा पैसा असलेल्या भारतीयांची यादी मोठी असून, ती जनतेसमोर आलीच पाहिजे. या काळ्या पैशांतून प्रत्येक भारतीयाच्या नावावर प्रत्येकी तीन लाख रुपये
जमा करण्याचे आश्वासनही
देण्यात आले होते. त्यामुळे जनतेने आशावादी राहून मोदी सरकारला मतदान केले.
दोन, तीन, चार नावे जाहीर करून अशा पद्धतीने काळा पैसा देशात येण्यास अनेक वर्षे लागतील. परिणामी मतदारांचा भ्रमनिरास होईल, असे सांगत काळ्या पैशांसंदर्भातील प्रत्येक व्यक्तीचे नावे समोर आलेच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. काळा पैसा देशात परत आला नाही तर त्या विरोधात नेतृत्व करणारे अनेकजण पुढे येतील. त्या आंदोलनात एक शिपाई म्हणून मी काम करणार आहे, असेही हजारे म्हणाले. (प्रतिनिधी)