मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही शिवस्वराज्य यात्रा रविवारी बीडमध्ये दाखल झाली होती. बीड येथील शिवस्वराज्य यात्रेची सभा राष्ट्रवादीचे आमदारकीचे इच्छूक उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या भाषणानेच गांजली. संदीप यांनी आपले काका आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल होऊन मंत्रीपदी विराजमान झालेले जयदत्त क्षीरसागर यांच्यावर कडाडून टीका केली. त्यामुळे बीडमध्ये काका-पुण्याची संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.
बीडमधील स्थानिक प्रश्नांना हात घातलल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर तोफ डागली. तब्बल ५० कोटी रुपये मोजून त्यांनी मंत्रीपद मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी मोरगाव गटातील विजयाची आठवण सर्वांना करून दिली. जयदत्त क्षीरसागर ज्या गटातून केवळ ४० मतांनी निवडून आले. तेथून आपण १० हजार मतांनी विजयी झाल्याचं त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मोरगाव येथील यात्रेतील प्रसंग सांगताना आपल्या काकांना व्यासपीठावरूनच इशारा दिला. यात्रेसारख्या सामाजिक कार्यक्रमात तुम्ही राजकारण करत आहात. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शांत होते. परंतु, पुढच्या वेळी असं घडलं तर अण्णा तुमचे कपडे फाडू, असं संदीप यांनी म्हटले. संदीप यांनी यावेळी जयदत्त यांच्या शिवसेना प्रवेशावर कडाडून टीका केली. अण्णा तुमचं वय आता ७५ वर्षे झालंय. कोणत्या वयात काय करायला हवं ते पाहा. या वयात धनुष्यबाण उचलाल तर बरगाड मो़डल, असा टोलाही त्यांनी लागवला. एकूणच राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या भाषणानेच गाजली.