मुंबई: दहिसर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयातून महत्त्वपूर्ण फाईल्स चोरी झाल्याप्रकरणी शुक्रवारी राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महामंडळाचे व्यवस्थापक नागेश जुंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 28 तारखेला झालेल्या या चोरीनंतर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित असल्याचाही खुलासा केला. गुन्हे तपास यंत्रणेने (सीआयडी) यापूर्वीच या घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स व कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली होती. त्यामुळे या कार्यालयात अन्य फायली व संगणक वगळता फार काही नव्हते, असा दावा दिलीप कांबळे यांनी केला. सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही चार मजली इमारत असून त्याच ठिकाणी २०१५ पर्यंत साठे महामंडळाचे कार्यालय होते. महामंडळाचे सर्व रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले आहेत. २०१२ ते २०१५ या काळातच महामंडळात कोट्यवधींचे घोटाळे झाले.
साठे महामंडळाच्या कार्यालयातून फायली लंपास करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या चेंबूर येथील कार्यालयास अस्मिता संस्थेकडून त्याच दिवशी देण्यात आली.फायली पळविणाऱ्यांमध्ये साठे महामंडळातील घोटाळ्यांमधील मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांचा भाऊदेखील होता, असे म्हटले आहे. आ. कदम या घोटाळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.
इमारतीच्या तळमजल्यावर तीस वर्षे अस्मिता या सामाजिक संस्थेच्या वतीने मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग-चिकित्सा व पुनर्वसन केंद्र चालविले जाते. या केंद्राच्या प्रमुख सुधा वाघ यांनी २८ एप्रिल रोजी घडलेल्या प्रकाराबाबत दहिसर पोलिसात तक्रार नोंदविली आहे. गुंड प्रवृत्तीचे चार-पाच जण इमारतीत आले. त्यांनी सील-कुलूप तोडून काही फायली, कागदपत्रे कारमध्ये भरणे सुरू केले. आमच्या केंद्राच्या कर्मचाºयांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी दादागिरी केली. तोडलेल्या कुलपांच्या जागी नवीन कुलपे व त्यावर जुजबी सील लावून ते कारने निघून गेले, असे या तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग ‘लोकमत’च्या हाती आले आहे.