पारनेर (जि. अहमदनगर) : पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक असून, निवडणूक प्रचारात घोषित केलेल्या काळ्या पैशांचे काय झाले, असा थेट सवाल उपस्थित करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन छेडणार असल्याचे जाहीर केले आहे.राळेगणसिद्धीत बुधवारी पत्रकारांशी बोलताना अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करत भ्रष्टाचार, सक्षम लोकपाल, शेतकरीविरोधी कायदे आणि काळा पैसा आदी विषयांबाबत सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट केले़ लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून वर्ष लोटले आहे़ याबाबत पंतप्रधान मोदी यांना दोनदा आठवण करून दिली़ त्यांनी मात्र, काहीच हालचाल केल्याचे दिसत नाही़ सरकारच्या या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सांगत अण्णा म्हणाले की, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने जनतेची फसवणूक केल्याने जनतेला बदल हवा होता़ त्यानंतर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व भारतीयांना मोठ्या अपेक्षा होत्या़ ते भ्रष्टाचार विरोधी लढ्याला प्राधान्य देतील असे वाटले होते़ मात्र, मोदी यांच्या बोलण्यात व कृतीत मोठा फरक असून, ते केवळ बोलतात कृती काहीच करत नाही़ मोदींनी भ्रष्टाचारमुक्त भारत व परदेशातील काळा पैसा देशात आणला जाईल, असे आश्वासन दिले होते. आता या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल अण्णांनी केला. मोदी यांनी काळा पैसा तर आणला नाहीच पण सक्षम लोकपाल कायदा होण्याबाबतही कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. तसेच जमीन अधिग्रहणाचा केलेला कायदाही शेतकऱ्यांच्या विरोधी आहे़ या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आपण पुन्हा दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
अण्णांचे दिल्लीत पुन्हा आंदोलन!
By admin | Published: January 29, 2015 3:27 AM