मुंबई : दिवाळीसाठी संपूर्ण मुंबापुरीत लखलखाट पसरला असताना भांडुपकरांना मात्र दिवाळीचे तीनही दिवस अंधारात काढावे लागले. पाडव्याच्या दिवशीही वीजपुरवठा खंडित केल्यामुळे सोमवारी रात्री उशिरा येथील नागरिकांनी ‘रास्ता रोको’ करत वीज वितरण विभागावरील रोष व्यक्त केला.भांडुप पश्चिम येथील सह्याद्रीनगर, समर्थनगर आणि बुद्धनगर येथील परिसरात दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून वीज नाही. नेमक्या सायंकाळच्या वेळी येथील वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत या परिसरात काळोख पसरला. या ठिकाणी नवीन केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पण मंगतरामपर्यंत केबल टाकण्यात आली असून, दिवाळी सुट्टीमुळे येथील काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यातच सोमवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संतप्त रहिवासी रात्री उशिरा रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला. जमाव पांगविण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची दखल घेत वीज वितरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले आणि त्यांनी रात्री उशिरा येथील वीजपुरवठा सुरळीत केला. दरम्यान, गेली दहा वर्षे या विभागात नवीन केबल टाकण्यात यावी अशी विनंती वीज वितरण विभागाला करण्यात आली आहे. येथील विजेच्या मागणीचा अतिरिक्त ताण पाहता ही विनंती करण्यात आली होती. हे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू करण्यात आले. सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित होते. पण ऐन दिवाळीत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक चिडले, असे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
ऐन दिवाळीत भांडुपकर अंधारात
By admin | Published: November 02, 2016 2:04 AM