नाशिक : वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमात स्त्रीच्या कौमार्य चाचणीचा उल्लेख करण्यात आला आहे. ही चाचणी अशास्त्रीय असल्याने हा विषय अभ्यासक्रमातून काढून टाकावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व जात पंचायत मूठमाती अभियानचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री, राज्यपाल व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिले आहे. काही समाजातील कौमार्य चाचणीच्या अनेक घटना उघड केल्या आहेत. काही घटनांत रीतसर गुन्हे दाखल केले आहेत. कौमार्य चाचणीचा व चारित्र्याचा काहीही संबंध नसतो. मात्र, अशा कुप्रथांना उत्तेजन देण्याचे काम वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून होत आहे. या संदर्भात वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयाचे प्राध्यापक डाॅ.इंद्रजीत खांडेकर यांनी अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास दिला आहे. जात पंचायतीकडून होत असलेल्या कौमार्य चाचणीवर अंनिसच्या पुढाकारामुळे सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. वैद्यकशास्त्रात कोणतेही संशोधन न झालेली कौमार्य चाचणी हा विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावा, अशी मागणी अविनाश पाटील व कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.
अभ्यासक्रमातून कौमार्य चाचणी वगळण्याची अंनिसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 10:03 AM