पुणे : ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष, कुलपतींनी जागविलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या आठवणी, माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि स्नेहांकितांचा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साहाच्या वातावरणात शनिवारी भारती विद्यापीठाचा ५०वा वर्धापनदिन साजरा झाला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, ॲड. रावसाहेब शिंदे, डॉ. उत्तमराव भोईटे, डॉ. एस. एफ. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विशेष शैक्षणिक प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, कला व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेले विद्याथी यांंच्या सन्मानाबरोबरच संस्थेमध्ये विशेष कार्य केलेल्या शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना सेवागौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पतंगराव कदम म्हणाले, विविध क्षेत्रातील स्पर्धा आणि गुणवत्तेचे महत्व लक्षात घेवून भारती विद्यापीठाने पुढील ५० वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. स्वप्न पाहणे आणि ते स्वप्न सत्यात उतरल्याचा अनुभव घेणे हे भाग्य खुप कमी लोकांच्या वाट्याला येते ते माझ्या वाट्याला आले आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षक पेशात काम करण्यासाठी उत्सुक असणार्यांची संख्या कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रा. के. डी. जाधव यांनी आभार मानले. डॉ. विवेक रणखांबे, डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सुत्रलसंचालन केले.
भारती विद्यापीठाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
By admin | Published: May 10, 2014 7:41 PM