दीपक शिंदे -सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाºया दिवसाची आज (१८ आॅक्टोबर) वर्षपूर्ती. होय, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा येथील भर पावसातील ‘ती’ सभा राज्यातील जनतेला भावली आणि विधानसभा निवडणुकीचा नूरच पालटला. सत्तेची आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी महाआघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपच्या गर्वाचे घर खाली आले. म्हणूनच या दिवसाचे महत्व!
सातारा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा एकेक बुरुज ढासळत होता. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंना भाजपने पक्षात घेतले होते. त्यामुळे हा किल्ला राखण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वत: रणांगणात उतरले. वर्षापूर्वी १८ आॅक्टोबरला सातारा जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक सभेने सर्वच राजकीय समीकरणे बदलून टाकली.
या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभेबद्दल उत्सुकता होती. पाटणमधील सभा उरकून पवारांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवताच पाऊस सुरू झाला; पण लोक जागचे हलले नाहीत. पवार बोलायला उभे राहिले आणि पावसाचा जोर वाढला. लोक समोर भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरची छत्री बाजूला केली आणि धो-धो पावसाबरोबरच धीरगंभीर आवाजात शरद पवारही बरसू लागले. 'गतवेळी माझी चूक झाली, ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे', असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आणि साताराच नव्हे तर, संपूर्ण राज्याचे राजकारण या सभेने बदलून टाकले. पवारांच्या या सभेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने या सभेच्या वर्षपूर्तीसाठी एका छोटेखानी सभेचे आयोजन केले आहे.नरेंद्र मोदींच्या तुलनेत सभा कशी होणार हे पाहण्यासाठी विरोधकही आले आणि सर्वात मोठी सभा झाली. या सभेमुळे पुन्हा एकदा शरद पवारांचा करिष्मा सर्वांना पाहायला मिळाला. - शशिकांत शिंदे, आमदार, विधान परिषद