मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन 13 महिन्यांहून अधिक काळ होऊन गेलेला आहे. मात्र, अद्याप साध्या एस. ई. ओ व महामंडळ नियुक्त्यादेखील झालेल्या नाहीत. त्यामुळे एस.ई. ओ. आणि महामंडळ नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी सचिव धनंजय जुन्नरकर (Dhananjay junnarkar) यांनी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना निवेदन दिले आहे. (Announce the Corporation, S.E.O. appointments, statement of former Mumbai Congress secretary to Nana Patole)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या पत्रावर सही करतील अशी शक्यता दिसत नाही, असे जुन्नरकर यांनी म्हटले आहे. सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त वाटत आहे. त्यांना पत्र देऊन व पद रिक्त राहून एक वर्ष व्हायला आले आहे.
महाराष्ट्रात तीन पक्षाची सत्ता असून त्यात काँग्रेसला सर्वात कमी वाटा मिळालेला आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, जोश निर्माण व्हावा हे अत्यंत गरजेचे आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांना गेल्या सहा-सात वर्षांत कोणतीही शासकीय पदे मिळालेले नाही. कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असतात सर्वांनाच पक्ष तिकीट देऊ शकत नाही, अशा वेळी चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ पदाधिकारी यांना न्याय देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र शासनाकडे 40 महामंडळे असून यात 350 ते 400 वरिष्ठ पदाधिकारी आणि एस.ई.ओ.च्या माध्यमातून महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोशात काम करू लागतील व कार्यकर्त्यांनादेखील न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी ज्यांची नावे गेली आहेत त्या नावांना महामंडळात सामील करून घेतल्यास त्यांच्यावरदेखील अन्याय होणार नाही ,असेही जुन्नरकर म्हणाले.