मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीत प्रवेश घेण्यासाठी शेवटची संधी म्हणून ५ आॅगस्टपासून विशेष फेरीचे आयोजन केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळाले, शाखाबदल करायचा आहे किंवा प्रवेशच मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेष फेरीत अर्ज करता येईल. त्यासाठी आधी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्याची गरज नाही, असे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या नजीकच्या महापालिका क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणि प्रवेशबदल करण्याची ही शेवटची संधी ठरणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ५ व ६ आॅगस्टदरम्यान नजीकच्या मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन नवीन लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. अकरावीच्या आॅनलाइन पुस्तिकेमध्ये या मार्गदर्शन केंद्रांची नावे दिलेली आहेत. पहिल्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना केवळ लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करता येईल.नव्याने अर्ज करताना विद्यार्थ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. ८ व ९ आॅगस्टदरम्यान रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन फॉर्म भरता येतील. या वेळी आॅनलाइन अर्ज भरताना ३५ महाविद्यालयांची नावे भरण्याची गरज नाही; शिवाय अर्जात कोणत्याही क्षेत्राचे बंधन ठेवण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांना हव्या त्या ठिकाणच्या किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांच्या नावाला पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. मात्र पसंतीक्रम देताना सुरुवातीला सर्वांत आवडत्या महाविद्यालयांना पसंती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांतील रिक्त जागांची संख्या, शेवटची कट आॅफ आणि महाविद्यालय अनुदानित आहे की विनाअनुदानित हे काळजीपूर्वक भरावे, असेही प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)>तरच आरक्षणाचा फायदा!जातीय आरक्षण किंवा विशेष आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ मंजूर करून घेण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची मदत घ्यावी लागेल. त्यानंतरच त्यांना पसंतीक्रम अर्ज उघडता येईल. पसंतीक्रम अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना तो स्वत:हून मंजूर करून सबमिट करता येईल.>90,000 हजार जागा रिक्त याआधी प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या किंवा अपूर्ण अर्ज भरल्याने प्रवेश प्रक्रियेबाहेर राहिलेल्या विद्यार्थ्यांना २ आॅगस्ट म्हणजेच मंगळवारपर्यंत आॅनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यानंतर ४ आॅगस्टला त्यांची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. अद्यापही प्रवेशापासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांसाठी ९० हजार ०३५ जागा उपलब्ध आहेत. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर ५ व ६ आॅगस्ट रोजी या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील. मात्र या विद्यार्थ्यांची संख्या १० हजारांहून अधिक नसल्याने किमान ८० हजारांहून अधिक जागा पहिल्या विशेष फेरीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.मार्गदर्शन केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी : अर्धवट अर्ज भरलेल्या किंवा अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून आॅनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. आॅनलाईन नोंदणीसोबतच अर्ज भरताना केलेल्या चुका सुधारण्यासाठी सोमवारी मार्गदर्शन केंद्रांवर विद्यार्थ्यांनी तोबा गर्दी केली होती. याआधी आॅनलाईन नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ३० जुलै रोजी आॅनलाईन माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते.>अकरावीच्या विशेष फेरीचे वेळापत्रक >५, ६ आॅगस्ट : नवीन लॉगीन आयडी, पासवर्ड तयार करणे८, ९ आॅगस्ट (रात्री ११.५८ वाजेपर्यंत) : आॅनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरणे११ आॅगस्ट (सायंकाळी ५ वाजता) : पहिली विशेष फेरी जाहीर होईल.१२, १३ आॅगस्ट : विशेष फेरीत ज्या महाविद्यालयात नाव निश्चित होईल, तिथे प्रवेश निश्चित करणे. (नाव जाहीर झाल्यानंतर याआधी एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतला असेल, तर तेथील प्रवेश रद्द करावा लागेल)१८ ते २३ आॅगस्ट : दुसरी विशेष फेरी जाहीर होईल. आवडत्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.२५ ते ३० आॅगस्ट : तिसरी विशेष फेरी जाहीर होईल. आवडत्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
अकरावीच्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर
By admin | Published: August 02, 2016 2:02 AM