पोलादपूर : मुसळधार पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे गाव येथील घरे दरडीखाली आल्याने ११ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केवनाळे गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले, तसेच दरडग्रस्त भागाची पाहणी केली.
कोकणात सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोड द्यावे लागत आहे. यासाठी राज्याचे पुनर्वसन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. ढवली, सावित्री, कामथी विभागांना जो बोरज फाटा येथील पूल जोडला जातो. त्याचा काही भाग वाहून गेला असल्यामुळे पाच हजारांहून अधिक लोकांचा संपर्क तुटल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत संबंधित खात्याला तातडीने दुरुस्तीचे आदेश देऊन जनतेची गैरसोय दूर करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्यांनी बाधित झालेल्या घोडवणी नदीवरील पुलाचा काही भाग वाहून गेल्याने पाहणी करून प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. यावेळी आबेमाची येथील ८४ नागरिक, एनडीआरफ, ग्रामस्त व स्थानिक कार्यकर्त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा त्यांनी घेतला.