अहमदनगरमध्ये प्रचाराला जाणार नाही; राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 01:26 PM2019-03-14T13:26:17+5:302019-03-14T13:40:53+5:30
लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर मतदारसंघात प्रचाराला जाणार नाही अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर मतदारसंघात प्रचाराला जाणार नाही अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. नगर लोकसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने प्रचार करणार नाही आणि मुलगा सुजय विखे पाटील याचाही प्रचार करणार नाही, अशी घोषणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
अहमदनगरच्या जागेवरून आघाडीत निर्माण झालेला तिढा सुटत नसल्याने वैतागलेल्या सुजय विखे पाटील यांनी भाजापमध्ये प्रवेश केला होता. त्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर स्वपक्षीयांकडूनच टीका करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ''मी अद्यापही काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाशी माझी बांधिलकी आहे. त्यामुळे माझ्याबाबत पक्ष आणि पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल.'' असे विखे पाटील म्हणाले.
Congress leader and Maharashtra LoP Radhakrishna Vikhe Patil in Mumbai: Sujay (son) did not consult me before joining BJP. About my resignation from the post of Leader of Opposition, I would say that I will follow whatever my party leadership asks me to do. pic.twitter.com/kmDQdF5qPP
— ANI (@ANI) March 14, 2019
सुजय विखे पाटील यांच्या भाजपामधील प्रवेशाबद्दल विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की ''सुजय विखे पाटील यांनी मला विचारून भाजपात प्रवेश केलेला नाही. मी नगरमध्ये त्यांच्या प्रचाराला जाणार नाही. तसेच त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचाही प्रचार करणार नाही.''
यावेळी शरद पवार यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबतही राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शरद पवार यांच्या मनाता बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल अद्यापही द्वेष कायम आहे. मात्र त्यांच्यासाऱख्या ज्येष्ठ नेत्याने हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. तसेच बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. बाळासाहेब थोरात हे स्वत:ला पक्षश्रेष्ठींपेक्षा मोठे समजतात का अशी विचारणा त्यांनी केली.