सातारा : शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करून पक्षांतर करण्याच्या आमदार शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेला प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तुम्ही म्हणाल तसं असं एका वाक्यात सर्वांनीच शिवेंद्रराजेंच्या भूमिकेसोबत राहण्याचं ठरविल्यानं आता भाजपा प्रवेशाची केवळ घोषणाच शिल्लक राहिल्याचे मानले जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी, आमदार शिवेंद्रराजे यांनी नगर विकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डासह आजी माजी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मतदान वाढविण्याबाबत प्राथमिक बोलणी झाल्यानंतर. आ. भोसले यांनी उपस्थितांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क झाल्याचे सांगून पक्षांतर करण्याचा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले, कोणावरही रूसुन, रागावून किंवा वाद आहेत म्हणून पक्ष सोडण्याचा विचार नाही. गेल्या पाच वर्षांत सत्तेपासून लांब राहिल्यामुळे अनेक विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होवू लागला आहे. विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्याबरोबरच अनेक अडचणी येतात. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपासोबत राहणं हिताचं आहे.याबैठकीला पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अॅड. दिलावर मुल्ला, निळकंठ पालेकर, प्रकाश गवळी, व्यंकटराव मोरे, यांच्यासह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.