कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेगळी उंची लाभलेला मानाचा शाहू पुरस्कार यंदा माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी येथे जाहीर झाला.
ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विश्वस्त व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २६ जूनला शाहू जयंतीदिनी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारकमध्ये होणाºया शानदार समारंभात या पुरस्काराचे वितरण होईल.किसन बाबूराव हजारे (जन्म १५ जून १९३७ मूळ गाव- भिंगार, जि. अहमदनगर) असे नाव असले तरी ते देशाला अण्णा हजारे या नावानेच परिचित आहेत. मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे अण्णा हजारे हे भारतातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांना समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने १९९० साली ‘पद्मश्री’ आणि १९९२ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी लोकसहभागातून राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला.
स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली. अण्णांनी पाठपुरावा केला म्हणूनच माहिती अधिकार कायदा लागू झाला. त्याशिवायही त्यांच्या आंदोलनामुळे एकूण सहा कायदे झाले आहेत. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे.
अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. लष्करातील निवृत्त जवान ते लोकपालाच्या कायद्यासाठी देशातील राजकीय व्यवस्थेला हादरे देणारा लढवय्या अशीच अण्णा हजारे यांची जगभरातील ओळख आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या गावाला विकासाचे मॉडेल बनविले व त्यातूनच ते महाराष्ट्राला परिचित झाले.आतापर्यंतचे पुरस्कार विजेते...समाजाला प्रगतीच्या दिशेने दोन पावले पुढे घेऊन जाणाऱ्या ध्येयवादी नेतृत्वास प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा पुरस्कारचे चौतिसावे वर्ष आहे. ट्रस्टतर्फे १९८४ ला पहिला पुरस्कार पुरोगामी कृतिशील विचारवंत भाई माधवराव बागल यांना देण्यात आला होता.त्यानंतर मेहरुनिसा दलवाई, मेघनाथ नागेशकर, कवी कुसुमाग्रज, गायिका आशा भोसले, जलतज्ञ राजेंद्र सिंह, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्था, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, माजी सरन्यायाधीश पी. बी. सावंत, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, आदी मान्यवरांचा या पुरस्काराने आतापर्यंत सन्मान केला आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने जाहीर झालेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे. शाहूंनी आपले सारे आयुष्य गोरगरीब पददलित जनतेच्या भल्यासाठी खर्ची घातले अशा थोर राजाच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार या घटकांसाठी काम करण्यासाठी नवी उमेद देणारा आहे.अण्णा हजारेज्येष्ठ समाजसेवक