लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वंचितांच्या न्यायासाठी झटणाऱ्या राज्यभरातील सहा संस्थांना सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार जाहीर केले आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या १२५ व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ (रत्नागिरी), महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था (पुणे), केशव स्मृती प्रतिष्ठान (जळगाव), शिवप्रभू बहुउद्देशीय क्रीडा शिक्षण सांस्कृतिक मंडळ (बुलडाणा), लॉर्ड बुद्धा मैत्रीय संघ (नागपूर) आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज संचालित डॉ. हेगडेवार रुग्णालय (गारखेडा, औरंगाबाद) अशा सहा संस्थांची निवड समितीने शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कारांसाठी निवड केली आहे. १५ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन या संस्थांना गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान’ पुरस्कारासाठी मुंबईतून २१, पुणे जिल्ह्यातून १३, नागपूर जिल्ह्यातून १२, नाशिक जिल्ह्यातून सात, भंडारा सहा, नाशिक आणि अमरावती, यवतमाळ, गोंदियातून प्रत्येकी पाच, जालना आणि धुळेतून प्रत्येकी चार, अहमदनगर, वाशिम, औरंगाबाद, ठाणे व सातारा जिल्ह्यातून प्रत्येकी तीन, अशाप्रकारे एकूण १२५ व्यक्तींची निवड झाली आहे. २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. पुरस्कार वितरण बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृहात होईल.
सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर
By admin | Published: May 23, 2017 3:34 AM