- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं आहे. भाजप - शिवसेनेने संयुक्त कार्यक्रम करत गृहनिर्माण धोरण जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना दोघांनीही गृहनिर्माण धोरणाचे फायदे सांगत मागच्या सरकारवर जोरदार टीका केली. युतीचं यापूर्वीचं सरकार टिकलं असतं तर सामान्यांना त्यावेळेसच माफक दरात घरं मिळाली असती असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
हक्काचे घर मिळावे म्हणून शिवसेनेने आंदोलने केली आहेत. महापालिकेला सोबत घेऊन विकास व्हावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. आघाडी सरकारच्या काळात प्रश्न सुटले नाहीत. जागेचा विकास झाल्यानंतरही मुंबईच्या मूळ जागांची नावं बदलली जाता कामा नये. बिल्डरांना नामकरणाचा घाट घालू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
आधीच्या सरकारने काहीच भुमिका घेतली नव्हती, मात्र आम्ही आमच्या भुमिकेवर ठाम आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. नवीन गृहनिर्माण धोरण हे बिल्डरांसाठी नसून सामान्य माणसांकरिता आहे. सामान्य माणसांसाठी घेतलेले कोणतेही निर्णय भाजप-शिवसेनेचं सरकार बदलणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास झाला तर सामान्य नागरिकांसाठी चांगल्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करता येतील. केवळ प्रश्नांवर चर्चा करत राहिलो तर कधीच विकास होणार नाही. आडमुठ्या धोरणामुळे गेल्या आठ-दहा वर्षात पुनर्विकासाचं कुठलंही काम होऊ शकलं नाही अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.