सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील मालवणसह राज्यातील चारही जिल्ह्यांमध्ये २३ सागरी किनाऱ्यांवर पर्यटन वाढीच्यादृष्टीने शासनाने पाण्यातील साहसी खेळांची योजना (वॉटर स्पोर्टस् पॉलिसी) जाहीर केली आहे. महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डामार्फत जाहीर केलेल्या या योजनेमुळे समुद्र व खाडीतील साहसी क्रीडा प्रकारांना अधिकृत दर्जा मिळून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जाणार आहे. परदेशी पर्यटकांनाही या योजनेमुळे विविध जलक्रीडा प्रकारांचा आनंद घेता येणार आहे. राज्याला ७२० किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे. या भागात दरवर्षी सुमारे साडेसहा कोटी भारतीय, तर पाच लाख विदेशी पर्यटक भेट देतात. या पर्यटनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला जलपर्यटनांचा म्हणावा तसा महसूल मिळत नाही. तसेच हे जलक्रीडा प्रकार चालविणारे संघही संघटित नाहीत. या किनाऱ्यांचा जास्तीतजास्त उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. (पान ७ वर) या योजनेत यांत्रिक व विनायांत्रिक अशा दोन्ही क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. यात वॉटर स्किर्इंग, पॅरासेलिंग, बनाना बोटिंग, विंड सर्फिंग याद्वारे कनोर्इंग, कयाकिंग, वॉटर राफटिंग, आदी क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. हे क्रीडा प्रकार सकाळी ६.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंतच घेण्यात येतील. तसेच खराब हवामान, पावसाळी परिस्थिती, वादळी परिस्थिती असल्यास हे क्रीडा प्रकार तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. मेरी टाईम बोर्डाकडूनच या जलक्रीडा प्रकारांची किनारपट्टीवरील हद्द ठरवून देण्यात येईल. याकरिता यांत्रिक बोटीसाठी दरवर्षी दहा हजार रुपये, विनायांत्रिक बोटीसाठी पाच हजार रुपये, तर पॅरासिलिंगसाठी ५० हजार रुपये दरवर्षी अनामत घेण्यात येईल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थेकडून दहा हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याचे प्रावधानही ठेवण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवरील चारही जिल्ह्यांत या साहसी जलक्रीडा प्रकारांची योजना तितकीशी सक्षम नव्हती. खासगी संस्थांमार्फत स्कूबा डायव्हिंग, बोटिंग, आदी केले जात असे. त्यामुळे या क्रीडा प्रकारांसाठी भारतातील तसेच परदेशी पर्यटक गोव्याची वाट धरत असत. शासनाच्या या योजनेमुळे सुरक्षित व खात्रीशीर जलक्रीडा पर्यटनाला चालना मिळणार आहे. (प्रतिनिधी)पर्यटकांचा विमा काढणारया योजनेंतर्गत पर्यटकांच्या सुरक्षिततेचा जास्त विचार करण्यात आला असून, या क्रीडा प्रकारात सहभागी होणाऱ्या पर्यटकाचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्याची अट मक्ता मिळालेल्या संस्थेला घालण्यात आली आहे. मक्ता मिळालेल्या संस्थेला मेरीटाईम बोर्डाकडून परवानगी देण्यात येईल. त्यानंतरच ती संस्था हे क्रीडा प्रकार चालवू शकेल. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जशी विम्याची अट घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ती संस्था राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेच्या नियम, अटी, शर्ती पूर्ण करून देणारी असली पाहिजे. आॅनलाईन बोली लावणारमेरी टाईम बोर्डाकडून या क्रीडा प्रकारांसाठी आॅनलाईन बोली लावण्यात येईल. यामध्ये जास्तीत जास्त बोली लावणाऱ्या संस्थेला याचा मक्ता दिला जाईल. या बोलीसाठी ६० गुण ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये त्या संस्थेकडे असलेली तज्ज्ञ मंडळी, लाईफ बोट तसेच तो स्थानिक असल्यास त्याला सर्वांत जास्त म्हणजे २० गुणही ठेवण्यात आले आहेत. या समुद्र किनाऱ्यांची निवड या क्रीडा प्रकारांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनारपट्टीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील १९ सुरक्षित किनारपट्ट्यांचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव बंदर विभागाकडे देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, रत्नागिरी, गणपतीपुळे, मुरूड हर्णे, गुहागर, दाभोळ, आंजर्ले, तर रायगड जिल्ह्यातील वर्सोली, किहिम, नागाव, अलिबाग, आक्षी, पालाव, रेवदंडा, काशीर, मुरूड, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, तर ठाणे जिल्ह्यातील वसई व मांडवा या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे.
चार जिल्ह्यांत समुद्रातील साहसी खेळांची योजना जाहीर
By admin | Published: August 26, 2016 10:30 PM