मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक, गट -क पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील विनायक निवृत्ती पाटील हे राज्यात प्रथम आले आहेत. महिलांमध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील हिना अन्सारी पहिल्या आल्या असून, मागासवर्गीय गटामध्ये नाशिकचे आशिष अहिरे यांनी पहिले स्थान पटकाविले आहे.एमपीएससीने कर सहायक गट-क परीक्षेसाठी गेल्या वर्षी ७ जूनला परीक्षा घेतली होती. एकूण ५९८ पदासाठी राज्यभरातून ४४ हजार १३८ जणांनी आॅनलाइन अर्ज केले होते. प्रत्यक्षात त्यापैकी ३७ हजार ९६१ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्याचा सविस्तर निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करण्यासाठी दहा दिवसाची मुदत असून, त्यांनी आॅनलाइन अर्ज करावयाचा आहे. परीक्षेत प्रथम येण्याचा मान पटकाविणारे विनायक पाटील हे कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील आहे. हिना परवीन लतीफ अन्सारी यांनी परीक्षेला बसलेल्या ११ हजार ६४५ महिलांमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. त्या मूळच्या वासिम जिल्ह्यातील रिसोडच्या असून, सध्या बुलडाणा जिल्ह्यात तलाठी म्हणून काम करीत आहेत. जिद्दीमुळे परीक्षेत यशकर सहायक गट- क पदाच्या परीक्षेत महिलांमध्ये प्रथम आलेल्या हिना अन्सारी या शेतकरी कुटुंबातील आहेत. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्याने पहिल्यांदा तलाठीची परीक्षा देऊन पास झाले, नोकरीमुळे थोडी स्थिरता आल्याने वरच्या पदाच्या परीक्षेची तयारी जिद्दीने सुरू केली होती, नोकरी करून अभ्यास करीत असताना, आईवडील व पतीकडून मोलाचे सहकार्य मिळाले, यापुढेही वरच्या स्तरावरील परीक्षा देऊ, असे हिना अन्सारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कर सहायक परीक्षेचा निकाल जाहीर
By admin | Published: February 10, 2016 2:27 AM