वेंगुर्ला - गणपती म्हणजे मराठी माणसाचे आराध्य दैवत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गणेशाची अनेक जागृत मंदिरे आढळतात. कोकणामधील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा या गावीही असेच एक अनोखे गणेश मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिरात चक्क दिवाळीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. बहुतांश गणेश मंदिरांमध्ये गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी प्रतिष्ठापित केलेली असते. तर काही मंदिरांमध्ये गणेशोत्सवात किंवा गणेश जयंती दिवशी गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. मात्र उभादांडा येथील गणेश मंदिर मात्र या सर्वाला अपवाद आहे. उभादांडा हे गाव वेंगुर्ला शहराला लागून आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावात वेंगुर्ला-शिरोडा मार्गावर रस्त्याच्या शेजारीच उभादांडा येथे हे मंदिर आहे. येथील गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजना दिवशी येथे गणेशाची प्रतिष्ठापना होते. कोकणातील घराघरांमध्ये गणेशोत्सवात ज्याप्रमाणे पारंपरिक आरास करून ज्याप्रमाणे गणेशपूजा केली जाते त्याचप्रमाणे येथील मंदिरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. येथील गणेशमूर्ती ही मातीची असते. गावातील गणपतीच्या चित्रशाळेमधून लक्ष्मीपूजनादिवशी वाजत गाजत गणेश मूर्ती आणून मंदिरात बसवली जाते. त्यानंतर मंदिरातील पूजादि विधी सुरु होतात.या गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मी पूजना दिवशी प्रतिष्ठापित होणारी गणेशमूर्ती 5 किंवा 11 दिवसांनी विसर्जित होत नाही. तर येथील गणेश मूर्तीचे विसर्जन हे होळीच्या दिवशी होते. विसर्जन झाल्यानंतर पुढच्या दिवाळीपर्यंत येथील मंदिरात गणेशाच्या फोटोची पूजा केली जाते. असे आगळे वेगळे गणेश मंदिर वेंगुर्ला येथील बस स्टॅंडपासून काही मिनिटांच्याच अंतरावर आहे. त्यामुळे हे मंदिर भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते. तसेच रेडी येथील प्रसिद्ध द्विभूज गणपतीही येथून काही किलोमीटर अंतरावर आहे.
अनोखे गणेश मंदिर! येथे गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी करतात गणेशाची प्रतिष्ठापना
By balkrishna.parab | Published: October 20, 2017 7:09 AM