- गजानन जानभोर
नागपूर, दि. १६ - आज दुपारी अचानक ब्लड बँकेतून फोन आला. तुमचा ए-पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे ना? एक सिरिअस पेशन्ट आहे. तातडीने रक्त द्यायचे आहे. तुम्ही देऊ शकाल का? नोंदणीकृत रक्तदाता आणि नियमित रक्त देत असल्याने तो फोन आला होता. लगेच ब्लड बँकेत गेलो.
रक्त देत असताना मनात विचार येत होते... कोण हा पेशन्ट? काय करीत असेल? कोणत्या गंभीर आजाराने ग्रासलेला असेल? त्याचे नाव काय? पण लगेच भानावर आलो. आपण नाव, जात, धर्म बघून रक्त देत असतो का? तो माणूस ओळखीचा निघाला! पुढे कुठे भेटला तर आपल्या मनात त्याच्याबद्दल उपकाराची भावना राहील, आपण त्याच्याकडे उपकृत म्हणून बघू! एरवी इतरांकडे बघतो तसे... हा सुद्धा एक अहंकारच ना! काही माणसे जाती-धर्मासाठी रक्ताला चटावलेली... मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय?
नाही विचारायचे त्याचे नाव आता? त्यालाही कधी कळणार नाही. ब्लड बँकेतून एक आंतरिक समाधान घेऊन परत आलो.... आपण जन्माला येतो तेव्हा एक नाळ असते, ती लगेच तुटते. दुसरी मात्र तुटू द्यायची नसते. आपल्यातील माणूसपण तीच जागवते आणि जगवतेही... रक्ताची नाती अशीच जन्मास येतात, माझे त्या अनोळखी, अनामिक माणसाशी आज निर्माण झाले तसेच...