मुंबई : सीएसटी ते कल्याणदरम्यानचा गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी आणखी एक १५ डबा लोकल चालविण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून केला जाणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर एक १५ डबा लोकल चालविण्याचा योग जुळून येईल. सध्या याच मार्गावर एक १५ डबा लोकल धावत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर सुरुवातीला नऊ डबा लोकल धावत असतानाच गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी १२ डबा लोकल चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नऊ डबा लोकलला आणखी तीन डबे जोडून १२ डबा लोकल दोन्ही मार्गांवर चालवण्यात आल्या. आता पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावर १२ डबा लोकलच धावत आहेत. मात्र या लोकलही अपुऱ्या पडत असल्याने १२ डबा लोकलला आणखी तीन डबे जोडून १५ डबा लोकल चालवण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला १५ डबाचा प्रयोग हा पश्चिम रेल्वेवर करण्यात आला. त्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली. या मार्गावर सध्या दोन १५ डबा लोकल धावत आहेत. पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेनेही १५ डबा लोकल चालविण्याचा निर्णय घेतला. प्रथम सीएसटी ते कल्याणपर्यंत १५ डबा जलद लोकल चालवण्यासाठी या मार्गावरील जलद थांब्यावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली. सध्या याच मार्गावरच एकच लोकल धावत असून, तिच्या १६ फेऱ्या होतात. त्यामुळे प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळत आहे. पहिली १५ डबा लोकल २0१२मध्ये धावल्यानंतर आणखी एक १५ डबा लोकल चालवण्याचा योग जुळवून आणला जात आहे. मात्र ही लोकल नक्की कधी सुरू होईल याबाबत निश्चित अशी तारीख सूत्रांनी सांगितली नाही. (प्रतिनिधी)>जलद फेऱ्यांमध्ये समावेशसीएसटी ते कल्याणपर्यंत जलद मार्गावर ही लोकल सुरू केली जाईल. ही लोकल सुरू केल्यास सध्या धावत असलेल्या जलद लोकल फेऱ्यांमध्ये ती समाविष्ट करण्याचा प्रयत्न राहील.
आणखी एक १५ डबा लोकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 1:40 AM