मुंबई : प्रवाशांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा भार आणि अपुरी पडत जाणारी लोकल सेवा व फेऱ्या पाहता आणखी १५ डबा लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू असून येत्या काही महिन्यांत पंधरा डबा लोकलची संख्या वाढेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील लोकलचा विस्तार हा चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत आहे. या मार्गावरून दिवसाला जवळपास ४0 लाख प्रवासी प्रवास करतात. तर एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या प्रवाशांसाठी १,३00 पर्यंत लोकल फेऱ्या होतात. यात बारा डबाबरोबरच पंधरा डबा लोकलचाही समावेश आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर तीनच पंधरा डबा लोकल असून उर्वरित लोकल बारा डब्यांच्या आहेत. तीन पंधरा डबा लोकलच्या मिळून ४५ फेऱ्या होतात. परंतु या फेऱ्याही अपूर्ण पडत असल्याने पश्चिम रेल्वेकडून आणखी पंधरा डबा लोकल वाढवता येतील का याचा अभ्यास केला जात आहे. अंधेरी ते बोरीवलीबरोबरच नायगाव, नालासोपारा, वसई आणि विरार स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे अंधेरी ते विरार दरम्यान गेल्या काही महिन्यात लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या. मात्र या फेऱ्यांवरही ताण पडत असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांना विचारले असता, पंधरा डबा लोकलची संख्या वाढवण्यावर भर देत आहोत. त्यादृष्टीने सर्वेक्षणही केले जात आहे. भविष्यात आणखी पंधरा डबा लोकल चालवण्याचे नियोजन सर्वेक्षणानंतर केले जाईल. (प्रतिनिधी)पश्चिम रेल्वेवर १४ नव्या लोकल फेऱ्या १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्या. चर्चगेट ते डहाणू, विरार ते डहाणू आणि दादर ते डहाणूपर्यंत फेऱ्यांचा समावेश होता. मात्र अंधेरी ते विरार दरम्यानच्या फेऱ्यांवर भर देण्यात आला नाही. आता या दरम्यानच्या फेऱ्याही वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
आणखी १५ डबा लोकल धावणार
By admin | Published: April 05, 2017 2:23 AM