पुणे : शहरातील स्वाईन फ्लुचा ताप आणखी वाढतच चालला असून आणखी २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकुण मृतांचा आकडा ४१ वर पोहचला आहे. दरम्यान, एकुण मृतांपैकी २५ जण राज्याच्या विविध भागातील असल्याची माहिती महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. शहरात जुलै महिन्यापासून स्वाईन फ्लुच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. तेव्हापासून आतापर्यंत रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लुची लक्षणे असलेल्या रुग्णांची रीघ सुरूच आहे. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १० आॅगस्टपर्यंत एकुण १० तर दि. २२ सप्टेंबरपर्यंत एकुण २० जणांचा स्वाईन फ्लुने मृत्यू झाला होता. दि. ८ आॅक्टोबरच्या अहवालानुसार आणखी २१ जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू दि. १ सप्टेंबरपासूनचे असून दोन दिवसांपुर्वी झालेल्या स्वाईन फ्लु आढावा समितीच्या बैठकीमध्ये या २१ जणांचा मृत्यू स्वाईन फ्लुनेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुण्यातील एकुण मृतांचा आकडा ४१ वर गेला आहे. दि. १ जानेवारीपासून सोमवारीपर्यंत शहरात एकुण २९९ रुग्णांना स्वाईन फ्लुची बाधा झाली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये १३२ जणांवर उपचार सुरू असून ३८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच शहरात दररोज स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळून येत आहेत. दि. ८ आॅक्टोबरला एकुण ५ हजार ४६४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ जणांना स्वाईन फ्लु झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर २११ जणांना टॅमी फ्लु गोळ्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एकुण मृतांपैकी १६ जण पुणे शहरातील रहिवासी असून उर्वरीत २५ जण राज्याच्या विविध भागातून पुण्यात उपचारासाठी आले होते. त्यामुळे केवळ शहरातील मृतांचा आकडा १६ वर गेला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये राज्याच्या विविध भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे एकुण मृतांमध्ये शहरासह राज्यातील विविध भागातील रुग्णांचाही समावेश आहे. सर्व मृत शहरातील नसल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. तसेच आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्लु तसेच डेंग्युला प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, असेही हंकारे यांनी सांगितले.स्वाईन फ्लुच्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड किंवा त्यांचे विलगीकरण करून उपचार करणे आवश्यक असते. महापालिकेचे नायडू रुग्णालय तसेच ससून रुग्णालयामध्ये ही व्यवस्था आहे. मात्र, अन्य रुग्णालयांबाबत आरोग्य विभागाकडे माहिती उपलब्ध नाही. काही रुग्णालयांकडून बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत उपचार करण्यास नकार दिला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी थेट ‘आयसीयु’मध्ये रुग्णाला अॅडमीट केले जाते. त्यामुळे या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे प्रकार घडत आहेत. यापार्श्वभुमीवर महापालिकेकडून सर्व धर्मादाय रुग्णालयांना पुन्हा सुचना दिल्या जातील, असे डॉ. हंकारे यांनी सांगितले. संबंधित रुग्णालयांनी स्वाईन फ्लुच्या रुग्णांना आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध करून द्यायला हवे. रुग्णालयातील राखीव बेड या रुग्णांना द्यावेत. त्यासाठी सर्व रुग्णालयांना सुचना दिल्या जातील. जी रुग्णालये रुग्णांना नाकारतील त्यांना नोटीस पाठवू, असे डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले.
दि. ८ आॅक्टोबरची स्थितीतपासणी - ५,४६४टॅमी फ्लु गोळ्या दिल्या - २११स्वाईन फ्लु बाधा - ७रुग्णालयात उपचार सुरू - १३२व्हेंटिलेटर - ३८मृत्यू - २१---------------दि. १ जानेवारी ते दि. ८ आॅक्टोबर यादरम्यानची स्थिती -एकुण तपासणी - ७,२२,५३३टॅमी फ्लु गोळ्या दिल्या - ११,२६०स्वाईन फ्लु बाधा - २९९एकुण मृत्यू - ४१-------------------